नमस्कार मित्रानो, मी प्रकाश पोळ. राज्यसेवा 2016 परीक्षेतून गटविकास अधिकारी या पदासाठी माझी निवड झाली आहे. रिजल्ट लागल्यापासून मी अनेक विद्यार्थी मित्रांशी बोललो आहे. बहुतेक जणांचा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे पोस्ट मिळण्यासाठी क्लास लावलाच पाहिजे का? क्लास लावल्याशिवाय पोस्ट मिळत नाही का? हा प्रश्न सर्वाना पडण्याचे कारण म्हणजे सध्या MPSC/UPSC क्षेत्रात क्लासेसचे प्रचंड मार्केटिंग चालू आहे. निवड झालेल्या प्रत्येक अधिकार्याचा फोटो कोणत्या ना कोणत्या क्लासच्या बॅनरवर असतो. काही क्लासेस वर्तमानपत्रातून भल्या मोठ्या जाहिराती देतात. त्यात निवड झालेल्या बहुतांशी अधिकाऱ्यांची नावे आणि फोटो छापलेले असतात.
महाराष्ट्रभर वितरित होणाऱ्या वर्तमानपत्रात या जाहिराती बघून तयारी करणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना वाटते कि निवड झालेले सर्व अधिकारी कोणत्या ना कोणत्या क्लासला होते. परंतु वस्तुस्थिती तशी नसते. बहुतांशी अधिकारी हे बिगर क्लासवाले असतात. मग त्यांचे फोटो क्लासवाले का छापतात? तर त्याचं असं आहे, जेव्हा एखादा विद्यार्थी कोणत्याही क्लासच्या मदतीशिवाय MPSC/UPSC चा अभ्यास करत असतो तेव्हा तो पूर्व आणि मुख्य परीक्षा क्लासच्या मार्गदर्शनाशिवाय पास होतो. परंतु मुलाखतीसाठी त्याला मार्गदर्शनाची आवश्यकता भासते. मग क्लासवाले मुलाखतीसाठी मोफत मार्गदर्शन करतात. त्यांच्यासाठी mock interviews आयोजित केले जातात. त्याबदल्यात त्यांच्याकडून त्यांचा एक फोटो आणि डिटेल्स घेतल्या जातात. जेव्हा अंतिम निकाल लागतो तेव्हा ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्यांचे फोटो तर क्लासवाल्यांकडे असतात. ते छापले जातात.
विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी मोफत मार्गदर्शन मिळालेले असते त्यामुळे ते या गोष्टीला objection घेत नाहीत. परंतु यामुळे लाखो विद्यार्थ्यांची दिशाभूल होते आणि त्यांचा असा समज होतो कि क्लास लावल्याशिवाय यश मिळत नाही. माझा अनुभव वेगळा आहे. क्लास लावला पाहिजे असं मला कधीच वाटलं नाही. परंतु आर्थिक परिस्थिती सक्षम असती तर कदाचित क्लास लावला असता. परंतु क्लासेसची अव्वाच्या सव्वा फी परवडणारी नव्हती. त्यामुळे self study वर भर दिला. राज्यसेवा पूर्व, मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर सर्वांप्रमाणे मीही एखाद्या क्लास चा मार्गदर्शन वर्ग join करायचे ठरवले. जेव्हा मुख्य परीक्षा संपते तेव्हा लगेच मुलाखतीचे मार्गदर्शन वर्ग सुरु होतात. राज्यसेवा 2016 ची मुख्य परीक्षा सप्टेंबर मध्ये संपली. एक महिन्याने STI मुख्य परीक्षा होती. मी आणि माझे दोन मित्र मुलाखत मार्गदर्शनासाठी एका क्लासमध्ये गेलो. माझा first key नुसार स्कोअर 350, आणि त्या दोन मित्रांचा 340, 373. आम्ही तिघेही मुलाखतीसाठी मार्गदर्शन पाहिजे म्हणून गेलो होतो. जातानाच एका मित्राने सांगितले कि 350 मार्क्स ला तुला तिथे मार्गदर्शन मिळणार नाही. मार्क्स वाढवून सांग. पण मला ते योग्य वाटले नाही. आम्ही तिघांनीही खरे स्कोअर सांगितले. तर त्या सरांचा रिस्पॉन्स वेगवेगळा होता.
- 340 मार्क्स - तुमची निवड होणार नाही. तुम्ही मुलाखतीची तयारी करू नका.
- 350 मार्क्स- तुम्हाला एखादी क्लास2 वगैरे मिळू शकते. तुमचा स्कोअर कमी आहे. सध्या तुम्ही STI मुख्य परीक्षेची तयारी करा.
- 373 मार्क्स- तुमचा स्कोअर खूप चांगला आहे. तुम्हाला 100% Dy.SP मिळेल. तुम्ही उद्यापासून जॉईन करा.
अजून second answer key यायची होती. तरी निष्कर्ष कसा काय काढला. आणि 340 वाला पास होईल कि नापास हे आधीच कसे ठरवले. अजून लेखी पेपरचे 100 मार्क्स बाकी होते. त्यात कुणाची किती क्षमता आहे याचा निर्णय क्षमता तपासण्याआधीच कसा होऊ शकतो. मार्गदर्शन करायचे कि नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न होता, पण प्रयत्नच करू नका असे सांगून नाउमेद का करायचे? मला राज्यसेवाच करायची असताना STI करायचा सल्ला देणे योग्य आहे का? जिथे मला 350 मार्क्स ला क्लास 2 पोस्ट मिळू शकते असे त्यांना वाटत होते. माझी लेखी परीक्षेची आणि मुलाखतीची क्षमता आधीच कशी तपासली? मग प्रत्यक्षात काय झालं? मला लेखी पेपरला 61 आणि मुलाखतीत 70 मार्क्स मिळाले. Second answer key ने 350 वरून 354 स्कोर झाला. एकूण बेरीज 485 होऊन गट विकास अधिकारी हि क्लास 1 पोस्ट मिळाली. महत्वाची गोष्ट हि कि मार्क्स चांगले असतील तरच त्या विद्यार्थ्याबद्दल आत्मीयता आणि कमी असतील तर दुजाभाव का ? ज्यांनी मला त्यावेळी मुलाखतीसाठी मार्गदर्शन करायला आत्मीयता दाखवली नाही त्यांनी माझे फोटो मात्र छापले...आमचा विद्यार्थी म्हणून. काही क्लास चालकांनी प्रामाणिक मदत केली. त्यांचे ऋण मी कधीच विसरणार नाही. इथे कुणाचाच उल्लेख करत नाही. मला मार्गदर्शन करणारे आणि न करणारे सर्वांबद्दल मला खूप आदर आहे. यश मिळाले तरी मी जमिनीवर आहे. फक्त भावी पिढीची दिशाभूल होऊ नये यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न. यात कुणावरही टीका करण्याचा, कुणाच्या भावना दुखवण्याचा हेतू नाही. क्लास लावावा कि नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र मी क्लास लावला नव्हता हि पण वस्तुस्थिती आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें